चारा टंचाईवर मात करण्याचे अपारंपारिक पर्याय

चारा टंचाई वर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची साठवणूक, त्याची पौष्टिकता आणि पचनियता वाढविण्याचे विविध पर्यायांची आपण याआधीच्या भागांमधून चर्चा केली. परंतु जिथे चाराच उपलब्ध नाही तिथे दुग्धोत्पादनाचा विचार न करता किमान जनावरे जगविण्यासाठी, अपारंपारिक गोष्टींचा चारा म्हणून वापर करता येईल.

फळे, भाजीपाला व शेतमाल प्रक्रिया उद्योगांचे अवशेष – फळे व भाजीपाला यांची प्रक्रिया करून विविध पदार्थ, रस, पेये, जॅम, जेली  तसेच रेडी टू कुक पदार्थ बनविले जातात. ही प्रक्रिया करताना नको असलेल्या वेगवेगळे घटकांची निर्मिती होते. त्याचा चारा म्हणून उपयोग होऊ शकतो.

१. बटाटा प्रक्रिया उद्योगाचे अवशेष – भारत जगातील क्रमांक तीनचा बटाटे उत्पादित करणारा देश आहे. त्याची मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करणेसाठी वापर होतो. त्यातून बटाट्याच्या साली, त्याचा पल्प, स्टार्च आणि वाया गेलेले बटाटे असे उपपदार्थ मिळतात. त्यात पाण्याचे प्रमाण अधिक आहे तसेच तंतुमय पदार्थ आणि प्रथिने कमी आहेत, त्यामुळे ह्या उपपदार्थांचा जनावरांच्या आहारात १० ते २० टक्केच समावेश करता येवू शकतो. त्यावर निर्जलीकरण प्रक्रिया केल्यास पाण्याचे प्रमाण कमी करून अधिक परिणामकारकरित्या त्याचा जनावरांच्या आहारात समावेश करता येईल तसेच त्याची साठवणूक करणे सहज शक्य होईल.

२. टोमॅटो प्रक्रिया उद्योगाचे अवशेष –  टोमॅटो पासून सॉस व केचअप बनविल्यावर त्यापासून जे उर्वरित पदार्थ राहतात त्यात ५५ % पर्यंत एकूण पचनीय घटक तसेच १५ % प्रथिने असतात. दुधाळ जनावरांच्या आहारात १५ ते २० % समावेश केला जाऊ शकतो.

३. विविध फळ प्रक्रिया उद्योगांचे अवशेष – संत्री, मोसंबी, आंबा तसेच इतर फळे ज्यांचा रस काढून प्रक्रिया केली जाते त्यांचे उर्वरित अवशेष जसे साली, पल्प, बिया मोठ्याप्रमाणावर उपलब्ध होतात, त्याचा वापर जनावरांच्या आहारात करता येवू शकतो. केळी चे वेफर्स बनवताना त्याच्या साली मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. फळांचे अवशेष ताजे आणि १० ते १५ टक्के पर्यंत जनावरांच्या आहारात वापरता येवू शकतात.

४. स्टार्च व मद्य निर्मिती उद्योगाचे उपपदार्थ – स्टार्च व मद्य बनवताना मका व इतर धान्यावर किण्वन प्रक्रिया केली जाते. यातून मका हस्क व ब्रेव्हरी वेस्ट (ब्रेवर्स ग्रेन) उपलब्ध होतात. याचा अनेक मोठ्या गोठ्यांवर सध्या चाऱ्याला पर्याय म्हणून पशुपालक वापर करत आहेत. परंतु ह्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. जनावरच्या एकूण चाऱ्यापैकी याचा वापर २० टक्के पेक्षा अधिक करू नये, याची दोन दिवसापेक्षा अधिक साठवणूक करू नये. अधिक दिवस साठा केल्यास यात मोठ्या प्रमाणावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यातून जनावरांना विषबाधा होऊ शकते.

बाजारातील भाजीपाल्याचे अवशेष – शहरातील तसेच अनेक मोठ्या गावातील आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे अवशेष तसेच विक्री न झालेला व सुकलेला भाजीपाला फेकून दिला जातो. हे योग्य रीतीने जमा केल्यास जनावरांना टंचाई काळात चाऱ्याचा स्वतातील पर्याय ठरू शकेल.

झाडांची पाने – मुद्दामहून लावलेली सुबाभूळ, शेवरी, दशरथ, तुती यासारखी झाडांची किंवा बांधावरील, माळरानावरील विविध जंगली झाडांची पाने जनावरांना पर्यायी चारा म्हणून देता येतात. सुबाभूळ व शेवरी यांची पाने सुरवातीला कमी प्रमाणात देण्यात यावी व जशी सवय होईल तसे त्याचे प्रमाण वाढवत न्यावे. अचानक जास्त पाने खाऊ घातल्यास पोटफुगीचा तसेच हगवण लागण्याचा त्रास होऊ शकतो. अनेक झाडांची पाने सहज पचत नाहीत व त्यात पोषक घटकही कमी असतात  त्यामुळे भाकड, कमी दुध देणारया गाई तसेच बैलांना याचा वापर करावा. 

          फळबागांची छाटणी केल्यावर मिळणारे पाने सुद्धा जनावरांना खाऊ घालता येतील परंतु त्यावर विषारी औषधांचे घटक शिल्लक नाहीत याची खात्री करूनच त्याचा आहारात समावेश करावा.

केळीची कंद – भारत केळी उत्पादनात जगात अग्रेसर देश आहे. केळीच्या झाडाला जमिनीमध्ये कंद असतात त्यात मोठ्या प्रमाणावर कर्बोदके असतात. हे कंद चांगले स्वच्छ करून ५ ते १० किलो प्रमाणे मोठ्या जनावरांच्या आहारात वापरता येवू शकतात. त्यात प्रथिनांचे प्रमाण कमी आहे तसेच टॅनीन नावाचा घटक असल्याने त्याचा प्रमाणापेक्षा अधिक वापर करू नये.

अझोला – टंचाई काळात फक्त चारा पिकेच नाही तर पशुखाद्याचेही दर वाढतात, त्यामुळे जनावरांना योग्य प्रमाणात पशुखाद्य देणे परवडत नाही. त्याचबरोबर सकस चारा उपलब्ध नसेल तर प्रथिने, क्षारखनिजे तसेच जीवनसत्वांची कमतरता होते. यावर पर्याय म्हणून उच्च प्रथिने आणि क्षार खनिजे असलेले अझोलाचा वापर दुधाळ जनावरांच्या आहारात करता येईल. 

अझोला ही एक फर्न प्रजातीतील पाण्यावर जोमदार वाढणारी वनस्पती आहे, तिच्याबरोबर सूक्ष्म अश्या नील हरित शेवाळाची वाढ होत असते. अझोला लागवड करणेसाठी जमिनीत खड्डा करून किंवा तयार युनिट वापरून १ फुट उंच पाणी साठेल अशी सोय करावी, ४ फुट बाय ८ फुट युनिट साठी २ घमेले माती, १ घमेले शेणखत व २५० ग्रॅम सुपर फोस्फेट टाकावे. त्यात अझोला कल्चर सोडल्यावर दोन ते तीन आठवड्यात अझोल्याची पूर्ण वाढ होते. ह्या युनिट मधून रोजएक ते दीड किलो अझोला काढता येतो. अझोल्यात २५ ते ३० टक्के प्रथिने, १० ते १५ टक्के क्षार खनिजे तसेच मोठ्या प्रमाणावर जीवनसत्वे असतात. दुधाळ जनावरांना एक ते दीड किलोपर्यंत अझोला रोज खाऊ घालता येतो.

हायड्रोपोनिक्स चारा  – “हायड्रो” म्हणजे पाणी आणि हायड्रोपोनिक्स म्हणजे फक्त पाण्याचा वापर करून माती विना वनस्पतीची वाढ करणे होय. यालाच मराठीत “जलजन्य वनस्पती” असे म्हणतात.

मका, सातू, गहू व बाजरी यांच्या पासून हायड्रोपोनिक्स चारा तयार करता येतो. मोड आलेले धान्य तरे मध्ये पसरवून त्यावर वेळोवेळी पाण्याचा फवारा मारून हायड्रोपोनिक्स चारा दहा दिवसांत तयार करता येतो. असा चारा प्रति जनावर दहा किलो पर्यंत वापरावे. यात सहज पचणाऱ्या घटकांचे  व पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने आहारात इतर वाळलेला चाऱ्याचा समावेश असावा जेणेकरून पचन योग्य रीतीने होईल.

यात फुटलेले दाणे वापरू नये, त्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच  ज्वारीचा वापर करू नये कारण ज्वारीच्या कवळ्या अंकुरात हायड्रो सायनिक अॅसिड असते जे जनावरांना अपायकारक असते.  

पारंपारिक पद्धतीत बी मातीत रुजताना त्यात साठविलेली उर्जा ही सुरवातीला जास्तीत जास्त मुळाच्या वाढीसाठी वापरली जाते परंतु हायड्रोपोनिक्स मध्ये हीच उर्जा अंकुर वाढविण्यासाठी वापरली जाते त्यामुळे त्याची जोमदार व वेगवान वाढ होते.

डॉ. सचिन दगडूराम रहाणे,
पशुधन विकास अधिकारी (गट अ),
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, कोतीज,
तालुका – कडेगाव, जिल्हा – सांगली

उन्हाळ्यात घ्या पशुधनाची काळजी

महाराष्ट्रात चालु वर्षी सर्वत्र अत्यल्प पाऊस झालाय, त्यामुळे संपुर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळा जानवण्याची शक्यता आहे.  विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात तर दर वर्षीच कडक उन्हाळा असतो. अश्या परिस्थितीत जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्याचबरोबर वाढलेल्या तापमानाचाही जनावरांच्या दुग्धोत्पादन  व आरोग्यावर विपरीत परिणाम दिसुन येतात. उष्ण वातावरणात जनावरे चारा कमी खातात, पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, वाढ़ खुंटते व वजन कमी होते तसेच आजरी पडण्याचे प्रमाण वाढते. जनावरे माजाची लक्षणे दाखवत नाहीत व त्यामुळे गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते. या सर्वांमुळे दुग्धोत्पादन कमी होते आणि दुग्धव्यवसाय तोट्यात येतो. त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेवूण उत्पादन टिकवुन ठेवावे.

            वाढलेल्या उष्णतेचा जनावरांवरील विपरीत परिणाम कमी करण्यासाठी दैनंदीन गोठ्याचे व्यवस्थापन, आहार नियोजन, आरोग्य आणि प्रजनन व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

दैनंदीन गोठ्याचे व्यवस्थापन

जनावरांना योग्य निवारा दिला आणि व्यवस्थापन केल्यास वाढलेल्या तापमानाचा परीणाम मोठ्या प्रमाणावर कमी करता येतो त्यासाठी पुढील प्रमाणे नियोजन करावे.

1.छतावर गवत किंवा पाचटाचे अच्छादन द्यावे. नाहीतर पत्र्यावर ऊन परावर्तित करणारा पांढरा रंग द्यावा.

2.गोठा हवेशीर असावा, गोठ्यात जनावरांची गर्दी नसावी.

3.गोठ्यात ऊन येत असल्यास गोणपाटाचे पडदे सोडावेत व त्यावर पाणी शिंपडावे.

4.शक्य असल्यास गोठ्यात स्पिंकलर किंवा फ़ॉगर्स वापरुन पाण्याचा शिडकाव करावा म्हणजे हवेतील उष्णता कमी होण्यास मदत होते.

5. गोठ्याच्या लगत सावली देणारी झाडे असावीत. मुक्तसंचार गोठा असल्यास त्याभवती किंवा आतमध्ये झाडे असावीत. गोठ्यापेक्षा झाडाची सावली अधिक थंड असते कारण झाडांच्या पानांतून होणा-या बाष्फ़ीभवनामुळे त्यालगतची हवा थंड होते.

6.सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर जनावरे चरायला सोडावीत म्हणजे दुपारच्या प्रखर ऊन्हापासुन बचाव होईल. तसेच कामाचे बैल उन्हामध्ये कामाला जुंपू नये.

7. उन्हाचा म्हैशींना, गाईंपेक्षा अधिक त्रास होतो, कारण त्यांच्या त्वचेत घर्मग्रंथी कमी असतात. म्हैशींना दिवसातून 2 वेळा थंड पाण्याने धुवावे किंवा डुंबन्यास सोडावे. डुंबणे किंवा चिखलात लोळणे ही म्हैशींची नैसर्गिक सवय आहे. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान योग्य राखण्यास मदत होते.

8.संकरीत गाई, लहान वासरे यांची उन्हाळ्यात विषेश काळजी घ्यावी.

आहार नियोजन

दुध उत्पादन व आरोग्य हे योग्य आहारावर अवलंबून आहे. दुग्धव्यवसायातील सर्वाधिक म्हणजे ७० ते ८०टक्के खर्च हा जनावरांच्या आहारावर होतो. उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानामुळे जनावरे चारा कमी खातात, त्याचबरोबर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्याने योग्य आहार नियोजन करने आवश्यक असते.

1.चारा सकाळी व संध्याकाळच्या थंड वातावरणात द्यावा. चारा दिवसातुन विभागुण थोडा थोडा द्यावा.

2. वाळलेला चारा पहाटे व रात्रीच्या वेळेस व हिरवा चारा जसे मका, लसुन घास, कडवळ दुपारी द्यावा. चारा कुट्टी करुन एकत्र करुन द्यावा जेणेकरुन वाया जाणार नाही तसेच सर्व प्रकारचा चारा खाल्ला जाईल.

3. वाळलेल्या चा-यावर मीठ आणि गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे निक्रुष्ठ चारा सुद्धा आवडीने खातात.

4. उन्हाळ्यात दिवसेंदिवस हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होत जाते त्यामुळे उन्हाळ्यापुर्वीच उपलब्ध अतिरिक्त हिरव्या चाऱ्याची मुरघास बनवून साठवणूक करावी. एका जनावराला दररोज १५ किलो मुरघास याप्रमाणे किती दिवसांसाठी चारा साठवायचा त्यानुसार मुरघास बनविण्याचे नियोजन करावे. मुरघास बनविण्यासाठी फुलोऱ्यात आलेला मका चाऱ्याची कुट्टी करून घ्यावी व त्याची मुरघास ब्यागेत किंवा मुरघास कोठीत चारा भरताना दाब देवून हवाबंद स्थितीत साठवण करावी.

5.भाताचे व गव्हाचे काड तसेच  सोयाबीन व  हरभरा यांचा भुसा अश्या प्रकारच्या निकृष्ठ चाऱ्याचे युरिया व गुळाची प्रक्रिया करून सकसता वाढवावी. त्यासाठी १०० किलो चाऱ्यासाठी ३ किलो युरिया, १ किलो गुळ, १ किलो मीठ व २० लिटर पाणी वापरून प्रक्रिया करून २१ दिवस हवाबंद करून नंतर हा चारा वापरावा.

6.हिरवा चारा उपलब्ध न झाल्यास स्वस्त पर्याय म्हणुन उस व वाढयाचा चाऱ्यात वापर वाढतो. वाढ्यामध्ये  ओक्झालेट नावाचा घटक मोठ्या प्रमाणावर असतो. हा घटक पचल्या जात नाही, तसेच शरीरातून बाहेर पडताना कॅल्शीअम बरोबर “कॅल्शीअम ओक्झालेट” नावाचे संयुग बनवून कॅल्शीअमलाही बाहेर घेऊन जातो.  हे टाळण्यासाठी एक किलो कळीचा चुना पाण्यात रात्र भर भिजू घालून त्यावर तयार होणारी निवळी  वाढ्यावर फवारून २४ तासाने वाढे जनावरांना खावू घालावे.

7. उन्हाळ्यात जनावरांच्या शरिराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी  घामाद्वारे शरीरातून पाणी बाहेर टाकले जात असते, त्यासाठी जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी २४ तास उपलब्ध असावे.

आरोग्य व्यवस्थापन

          उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. उष्माघात, रक्तिहगवण, किरळ लागणे, विषबाधा, अखाद्य वस्तु खाणे असे आजार तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास साथीचे विविध रोग जनावरांना होऊ शकतात.

1. उष्माघात – प्रखर उन्हात बैल कामाला जुंपल्यास किंवा गाई म्हैशी चरायला सोडल्यास, जनावरे चक्कर येवून पडतात व दगावतात. यास  उष्माघात म्हणतात. उष्माघातात जनावरांच्या श्वसनाचा वेग वाढतो, ह्रुदयाचे ठोके वाढतात, खुप घाम येतो, लाळ गळते, कधी कधी नाकातुन रक्तस्त्राव होतो. शरिराचे तापमान वाढुन 103 ते 106 अंश फ़ॅरनहीट होते व जनावर बेशुद्ध पडते. अश्या वेळेस जनावर सावलीत बांधुन शरीरावर थंड पाणी टाकावे किंवा ओले कापड टाकावे. पशुवैद्यकाकडून उपचार करुन घ्यावेत, यात ज्वर  नाशक आणि सलाईन चा वापर करावा.

2.रक्तिहगवण – उन्हाळ्यात पाण्याची कमतरता झाल्यावर जनावरे डबक्यातील व ईतरत्र साठलेले खराब पाणी पितात, त्यातुन विविध जिवाणू, विषाणू व बुरशीजन्य रोगंचा प्रादुर्भाव होऊन हगवण लागते, प्रादुर्भाव अधिक झाल्यास रक्तिहगवण होऊ शकते. शेण पातळ होते, त्याला खुप घाण वास येतो, जनावर मलुल होते, त्वचा शुष्क होते, डोळे खोल जातात वेळेत उपचार न मिळाल्यास जनावर दगावु शकते. हे टाळण्यासाठी जनावरांना शुद्ध पाणी पाजावे.  पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करुन घ्यावेत.

3.किरळ लागणे विविध विषबाधा – कोवळी ज्वारिचे धाटे तसेच अपुर्ण वाढ झालेल्या ज्वारिच्या कडब्यात असलेल्या “हायड्रोसायनिक ॲसीड” मुळे जनावरांमध्ये विषबाधा होते त्याला किरळ लागणे असे म्हणतात. तसेच चारा उपलब्ध नसल्याने अनेकवेळा जनावरे चरताना विषारी वनस्पती खातात, तसेच निक्रूष्ठ प्रतीचा बुरशी वाढलेला चारा सुद्धा खातात. यातुन विविध प्रकारच्या विषबाधा होतात. विषबाधेचे लक्षणे दिसताच जनावरांचा चारा बदलावा, प्रथोमोपचार म्हणुन कोळश्याची भुकटी करुन पाजावे व पुढील उपचारासाठी पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.

4.अखाद्य वस्तु खाणे चारा पोटभरुन न मिळाल्यास व फ़ोस्फ़रसची शरिरात कमतरता झाल्यास जनावरे अखाद्य वस्तु जसे कापड, दोरी खातात, माती किंवा दगड चाटतात. यामुळे पचनात अडथळा निर्माण होवू शकतो तसेच यातुन तार खिळे यासारखे टोकदार वस्तु पोटात गेल्यास व  वेळेत शस्त्रक्रिया करुन ते बाहेर न काढल्यास जनावर दगावु शकते. हे टाळण्यासाठी योग्य प्रमाणात चारा उपलब्ध करावा तसेच क्षार मिश्रणाचा पुरवठा करावा.  फ़ोस्फ़रसची ईंजेक्शन करुन घ्यावीत.

5.साथीचे रोग –  उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास साथीचे विविध रोग जनावरांना होऊ शकतात. यावर उपाय म्हणुन वर्षातून दोनदा लाळ खुरकत रोगाची व उन्हाळ्याच्या शेवटी घटसर्प व फ़-या रोगाची लस टोचून घ्यावी. ज्या भागात फ़ाशी (अन्थ्रॅक्स), आंत्रविषार, गोचिड ताप, ब्रुसेल्ला हे रोग आढळतात तिथे त्या त्या रोगाची लस टोचून घ्यावी.

          याचबरोबर जनावरांना वयानुसार वेळोवेळी जंतनाशके देण्यात यावीत.

प्रजनन व्यवस्थापन – 

जनावरे विशेषतः म्हैशी उन्हाळ्यात  माजाची लक्षणे दाखवत नाहीत  व गाभण राहण्याचे प्रमाण कमी असते. माजाची लक्षणे ओळखण्यासाठी जनावरांचे पहाटे व संध्याकाळी निरीक्षण करावे. माजाची इतर लक्षणे जसे अवेळी पान्हवणे, दुधातील फ़ॅटचे प्रमाण कमी होणे, जनावर बैचेन असणे, व्यवस्थित चारा न खाणे, सारखी लघवी करणे अश्या लक्षणांवर सुद्धा लक्ष ठेवावे. माजावर न येणाऱ्या जनावरांचे पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी व आवश्यक तो उपचार करून घ्यावा. त्यांना अधिकचे क्षार खनिजे व जीवनसत्वाचा पुरवठा करावा म्हणजे शरीरातील कमतरता भरून निघून व्यवस्थित माज करून गाभण राहण्यास मदत होईल. जनावरे वेळेत गाभण रहिल्यास भाकड काळ कमी होवून, अनुत्पादक जनावरे सांभाळण्याचा खर्च कमी होईल.

          अश्याप्रकारे नियोजन व व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात कमी झालेले दुधउत्पादन टिकवुन ठेवता येईल व आरोग्यपुर्ण जनावरेही सांभळता येतील.

डॉ. सचिन दगडूराम रहाणे,
पशुधन विकास अधिकारी (गट अ),
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, कोतीज,
तालुका – कडेगाव, जिल्हा – सांगली

उसाच्या वाढ्यांपासून बनवा पौष्टिक मुरघास

महाराष्ट्राला दर वर्षीच थोड्या फार प्रमाणावर दुष्काळाचा सामना करावा लागतो. चालू वर्षी १५० हून अधिक तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. येत्या एक दोन महिन्यात टंचाई अधिक त्रीव्र होत जाईल. पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बिकट होईल. चारा व्यवस्थापन योग्य रीतीने न झाल्यास, दुग्धव्यवसाय तोट्यात जाऊन पशुपालकांना ताजा पैसा देणारा व्यवसाय अडचणीत येवू शकतो. म्हणून उपलब्ध चारा शास्त्रीय पद्धतीने साठविणे, योग्यरीतीने वापरणे तसेच चाऱ्याची पौष्टिकता वाढविणे आणि त्याही पूढे अश्या चाऱ्याची पचनियता वाढवण्यासाठी सोप्या परंतु स्वस्त आणि परिणामकारक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दुग्धव्यवसायात सर्वात जास्त खर्च हा जनावरांच्या आहारावर होत असतो. टंचाई परिस्थितीत चारा उपलब्ध न झाल्यास, जनावरांना पिकांच्या अवशेषांवर किंवा निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावर गुजराण करावे लागते. योग्य पोषण मुल्ये न मिळाल्यामुळे दुग्धोत्पादन व प्रजनन दोन्हीही बाधित होते.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये उस हे एक प्रमुख पिक आहे. त्यामुळे वाढ्याचा जनावरांच्या चाऱ्यात मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दुष्काळात चारा छावण्यात वाढ्याचा व उसाचा स्वस्त आणि एकमेव उपलब्ध चारा म्हणून वापर होत असतो. शास्त्रीय दृष्ट्या वाढे खरेतर चारा नव्हेतच. कारण वाढयामध्ये प्रथिने फक्त  १.५ टक्केच असतात, त्यात पचनीय घटकांचे प्रमाणही खूप कमी असते ह्याशिवाय वाढ्यामध्ये  ओक्झालेट नावाचा घटक मोठ्या प्रमाणावर असतो. हा घटक पचल्या जात नाही, तसेच शरीरातून बाहेर पडताना कॅल्शीअम बरोबर “कॅल्शीअम ओक्झालेट” नावाचे संयुग बनवून कॅल्शीअमलाही बाहेर घेऊन जातो. अश्याप्रकारे शरीरातील कॅल्शीअम कमी झाल्याने आतड्यामधून फॉस्फरस नावाचा घटकही कमी प्रमाणात शोषल्या जातो. परिणामी शरीराला आवश्यक असणाऱ्या दोन्हीही क्षार घटकांची कमतरता होते. वाढ्याच्या मोठ्या प्रमाणावर व सातत्याने चारा म्हणून होणाऱ्या वापराणे जनावरांच्या प्रकृतीवर व दुग्धोत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे दुग्धोत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते. जनावरे गाभण राहत नाहीत व वारंवार उलटतात.

हे सर्व असले तरीही आज वाढ्यांचा जनावरांच्या आहारात सर्रास वापर सुरु आहे. उस तोडणीच्या कालावधीतच वाढे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. पशुपालक अतिरिक्त वाढे वळवून साठवून ठेवतात. वाळलेल्या वाढ्यांतील पौष्टिक घटक आणखीन कमी होतात तसेच त्याची पचानियता सुद्धा कमी होत जाते. जनावरे वाळलेले वाढे पूर्णपणे खात नाहीत. यासाठी वाढ्यामधील प्रथिने वाढवणे, पचनियता वाढविणे व  ओक्झालेट कमी करण्यासाठी त्याचा मुरघास बनविणे हा एक उत्तम उपाय आहे.

मुरघास म्हणजे काय –

चाऱ्यातील जास्तीत जास्त पौष्टिक घटक आहे त्या स्थितीत दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी, चारा हवाबंद करून, त्यात नियंत्रित किण्वन प्रक्रिया होऊन, चाऱ्याचा सामू ३.५ ते ४ पर्यंत खाली आणून, साठवणूक करण्याच्या प्रक्रियेला मुरघास म्हणतात.

वाढ्यांचा मुरघास कसा तयार करवा –

          वाढ्यांमध्ये ७० ते ८० टक्के पाणी असते. चांगला मुरघास तयार होण्यासाठी पाण्याचे प्रमाण ६५ टक्के असणे आवश्यक आहे. पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी एक दिवस वाढे सुकून द्यावे व दुसऱ्या दिवशी त्याची कुट्टी करून घ्यावी. कुट्टी केलेल्या एक टन वाढ्यांवर ५ किलो युरिया १० लिटर पाण्यात विरघळून पंपाच्या सहाय्याने एकसारखा फवारून घ्यावा. मुरघास बंकर/हौदाचा दरवाजा लाकडी फळ्या व प्लास्टिकचा कागद वापरून बंद करावे. बॅग वापरणार असल्यास सपाट जागेवर बॅग उघडून धरावी व आतील प्लास्टिकची बॅग (ईनर) सर्व कोपरयात व्यवस्थित बसवून घ्यावी.  बंकर/हौद किंवा बॅग मध्ये  कुट्टी केलेला चारा भरण्यास सुरवात करावी. प्रत्येक थर व्यवस्थित दाबून भरावा. प्रत्येक अर्धा फुटाच्या थरानंतर बॅसिलस सबटीलीस जीवाणू असलेले मुरघास कल्चर टाकावे.

          थरावर थर व्यवस्थित दाबून बंकर/हौद किंवा बॅग भरून घ्यावी. दाब देण्यासाठी पायाने तुडवून किंवा धुम्मसच्या सहाय्याने किंवा बंकरच्या बाबतीत ट्रक्टरच्या सहाय्याने चारा दाबून भरावा जेणेकरून त्यात हवा शिल्लक राहणार नाही. बंकरच्या वरील बाजूस एक ते दीड फूट जास्त चारा भरून त्यावर प्लास्टिक कागदाचे हवाबंद अच्छादन करावे. त्यावरुन बंकरच्या वरील भागावर वाळूचे भरलेल्या गोण्या किंवा विटा यांचे वजन ठेवावे जेणेकरून बंकर हवाबंद होईल. बॅगचे तोंड व्यवस्थित बांधून त्यावरही वजन ठेवावे.  नैसर्गिकरित्या मुरघास ४५ दिवसांत तयार होतो, परंतु मुरघास कल्चरचा वापर केल्यास २१ दिवसात मुरघास तयार होतो.

मुरघास खाऊ घालण्याची पद्धत –

         ज्यावेळेस चाऱ्याची गरज असेन त्यावेळेस मुरघास उघडावा. एकदा मुरघास उघडल्यावर रोज त्यातील कमीत कमी १ ते १.५ फुट जाडीचा थर मुरघास संपेपर्यंत वापरला पाहिजे व काढून झाल्यावर पुन्हा व्यवस्थित हवाबंद करून ठेवावा. सहा महिने पेक्षा कमी वयाच्या वासरांना मुरघास खाऊ घालू नये. मोठ्या जनावरांना १० ते १५ किलो मुरघास खाऊ घालता येतो. मुरघासाला येणाऱ्या आंबट गोड वासामुळे जनावरे मुरघास आवडीने खातात.

          त्यावर बुरशी आली असल्यास किंवा रंग काळपट झाला असल्यास असा मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.

मुरघास चे फायदे –

 • उस तोडणीच्या दिवसात उपलब्ध होणारे अतिरिक्त वाढे त्याची पौष्टिकता वाढवून १ ते १.५ वर्षें साठवता येतात
 • मुरघासत वापरलेल्या युरिया व किण्वन करणाऱ्या जीवाणूंमुळे वाढ्यामधील प्रथिनांचे प्रमाण वाढते, ओक्झालेट कमी होते व किण्वन प्रक्रिया झाल्याने त्यातील पचनीय कर्बोदके, शर्करा यांचे प्रमाण वाढते.
 • टंचाईच्या काळात वाढे पौष्टिक मुरघासच्या स्वरुपात प्राप्त झालेने दुग्ध उत्पादन टिकून राहते.
 • रोज चारा आणणे व कुट्टी करणे साठी लागणारा वेळ वाचतो. त्यामुळे मजूरही कमी लागतात.
 • कमी जागेत जास्त चाऱ्याची साठवणूक करता येते. एका घनमीटर जागेत ५५० ते ६०० किलो मुरघास साठविता येतो.
 • मुरघास केल्याने वाढ्यांची चव व गोडी वाढल्याने, असा मुरघास आवडीने व संपूर्णपणे खाल्ला जात असल्याने नासाडी होत नाही
 • मुरघास बनताना त्यातील ओक्झालेट चे प्रमाण कमी झाल्याने त्याचे होणारे विपरीत परिणाम होत नाहीत.

उसाचे वाढे आणि त्यापासून बनविलेल्या मुरघासातील घटकांचे तुलनात्मक प्रमाण

चारा शुष्क घटक (%) प्रथिने (%) तंतुमय पदार्थ (%) इथर एक्स्ट्रॅक्ट   नायट्रोजन फ्री एक्स्ट्रॅक्ट कॅल्शियम फॉस्फरस सामू
उसाचे वाढे                
उसाच्या वाढ्यांचा मुरघास                

डॉ. सचिन रहाणे (७०३८५३५१८१) , डॉ संतोष वाकचौरे (७०८३६३९५५३) ,
पशुधन विकास अधिकारी तथा सदस्य “चारा साक्षरता अभियान” समन्वय समिती, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

संवर्धके वापरून बनवा उत्कृष्ट प्रतीचा मुरघास

मुरघास तयार होताना होणाऱ्या जैव रासायनिक क्रिया आपण समजून घेतल्या आणि त्यानुसार मुरघास तयार करताना संवर्धके वापरली तर उत्कृष्ट प्रतीचा मुरघास तयार करता येईल.

मुरघास तयार होतानाचे जैव रासायनिक बदल –

          मुरघास तयार होताना चाऱ्यात अनेक जैव रासायनिक बदल होतात.  त्यामुळे चाऱ्याचा सामू ३.५ ते ४ इतका कमी होऊन चारा अनेक महिने आहे त्या स्थितीत साठवता येतो. चाऱ्याचे मुरघासात रुपांतर होताना खालील क्रिया होतात.

 • श्वसन

         हिरवा चारा हवाबंद केल्यानंतर त्यात शिल्लक असलेला प्राणवायू (ऑक्सिजन) हा चारा पिकातील पेशी, सूक्ष्म जीवाणू व एकपेशीय बुरशी श्वसनासाठी वापरतात. सुरवातीच्या दोन दिवसातच हळूहळू प्राणवायू संपतो व श्वसनाची प्रक्रिया बंद होते. त्यामुळे चाऱ्याच्या पेशीतील होणाऱ्या जैविक प्रक्रिया थांबतात. तापमान २० ते ३२ अंश सेल्सिअस पर्यंत असते.

 • लॅक्टिक अॅसिड किण्वन प्रक्रिया

चाऱ्यावर निसर्गतः अनेक प्रकारचे जीवाणू असतात त्याचबरोबर मुरघास कल्चर मधील जीवाणू स्वतःच्या वाढीसाठी चाऱ्यातील कर्बोदके वापरतात त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे आम्ल तयार होतात. यात प्रामुख्याने लॅक्टिक अॅसिड तयार होणे अपेक्षित आहे त्यासाठी लॅक्टोबॅसिलस जीवाणूंची जास्तीत जास्त वाढ होणे गरजेचे असते.  ह्या जीवाणूंची वाढ सहज पचणाऱ्या कर्बोदकांवर अवलंबून असते. हे जीवाणू प्राणवायू असताना व नसताना  २७ ते ३७ अंश सेल्सिअस तापमानात जोमाने वाढतात व लॅक्टिक अॅसिड तयार करतात. लॅक्टिक अॅसिड चे प्रमाण हळूहळू वाढत जाऊन २१ दिवसात चाऱ्याचा सामू (पीएच) ४ पेक्षा कमी झाल्यावर जीवाणूंची वाढ थांबते पर्यायाने किण्वन प्रक्रिया सुद्धा थांबते. योग्य ते मुरघास कल्चर वापरल्यास          लॅक्टिक अॅसिड किण्वन प्रक्रिया अधिक जलद गतीने होते.

 • चाऱ्यातील एन्जाइम्स च्या क्रिया

चाऱ्यातील जैव रासायनिक क्रिया ह्या एन्जाइम्स मुळे घडून येत असतात. त्यातूनही वेगवेगळे आम्ल तयार होतात. यात अॅसेटिक अॅसिड, ब्यूटरिक अॅसिड, प्रोपीओनिक अॅसिड आणि लॅक्टिक अॅसिड तयार होतात. ह्यांच्या मुळे मुरघासाला चव व गंध प्राप्त होत असतो. अॅसेटिक अॅसिड मुळे व्हिनेगार सारखा आंबट वास येतो तर लॅक्टिक अॅसिड मुळे आंबट गोड वास येतो. परंतु ब्यूटरिक अॅसिड अधिक निर्माण झाल्यास मुरघासाला खराब वास येतो. त्यामुळे उत्तम मुरघास तयार होण्यासाठी चाऱ्याच्या एन्जाइम्स क्रिया लवकर थांबणे आवश्यक असते. चाऱ्याचा सामू ४ पेक्षा कमी झाल्यास व तापमान वाढल्यानंतर ह्या क्रिया बंद होतात.

तयार मुरघासाला सोनेरी पिवळा रंग व आंबट गोड वास येतो. तो हवाबंद ठेवल्यास आहे असाच दीड ते दोन वर्षापर्यंत सुद्धा साठवता येतो.

मुरघास उत्तम बनण्यासाठी वापरावयाचे विविध संवर्धके –  

         काहीही संवर्धके न मिसळता  हिरव्या मक्याचा उत्तम मुरघास तयार होतो. परंतु इतर पिकांचा मुरघास बनविताना विविध  संवर्धके वापरल्यास त्याची पौष्टिकता वाढवता येईल. ते पुढील प्रमाणे

अ)किण्वन प्रक्रिया वाढविण्यासाठीचे संवर्धके – काही पिकांमध्ये किण्वन प्रक्रिया होण्यासाठीचे जिवाणूंचे    योग्य प्रमाण नसल्यास त्यात बाहेरून काही जीवाणू संवर्धके (मुरघास कल्चर) वापरावीत. यात प्रामुख्याने लॅक्टिक अॅसिड तयार करणारे जीवाणू असतात. हे वापरल्याने योग्य प्रकारे किण्वन होऊन अनावश्यक जीवाणू व बुरशीची वाढ थांबते.

ब)मुरघासाची पौष्टिकता वाढविण्यासाठीचे संवर्धके – उसाच्या वाढ्यांसारख्या काही पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते त्यावेळेस नत्राचे प्रमाण वाढविणारे घटक जसे युरिया ३ ते ५ किलो प्रति टन वापरावा. तसेच कर्बोदकांचे प्रमाण वाढविण्यासाठी मळी किंवा गुळ १० ते २० किलो प्रति टन वापरावे. तसेच युरियाच्या वापरामुळे उसाचे वाढे, संकरीत नेपिअर सारख्या चारा पिकातील अपायकारक ऑक्झालेटचे प्रमाण कमी करता येते. युरिया व गुळाचे प्रमाण पिकाच्या गुणवत्ते नुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने ठरवावे.

क) मुरघासाची पाचकता वाढविण्यासाठीचे संवर्धके – काही पिकांमधील न पचणाऱ्या तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते, अश्यावेळेस त्यात एन्जाइम्सचा वापर केल्यास ते पचनास सोपे होते. तसेच तंतुमय पदार्थांमधील शर्करा जीवाणूंच्या किण्वन प्रक्रियेस सहज उपलब्ध होते. त्यामुळे मुरघास लवकर तयार होण्यास मदत होते. तसेच एन्जाइम्स च्या वापरामुळे तयार मुरघास, जनावरांच्या कोठी पोटातील जीवाणूंना सुद्धा पचनास सोपा जातो व अधिकाधिक उर्जा तयार होऊन जनावरांची उत्पादकता वाढते.

उत्कृष्ट मुरघासाचे वैशिष्टे –

 • उत्तम तयार झालेल्या मुरघासाला सोनेरी पिवळा किंवा हिरवट पिवळा रंग येतो
 • आंबट गोड वास येतो इतर कुठलाही अमोनियाचा किंवा इतर वास येत नाहीत
 • उत्तम मुरघासाचा सामू (पीएच) ३.५ ते ४ असतो
 • त्यात ६५ ते ७० टक्के ओलावा असतो

डॉ. सचिन रहाणे (७०३८५३५१८१) , डॉ संतोष वाकचौरे (७०८३६३९५५३) ,
पशुधन विकास अधिकारी तथा सदस्य “चारा साक्षरता अभियान” समन्वय समिती, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी – मुरघास

वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी – मुरघास

         महाराष्ट्रात उन्हाळ्यात नेहमीच मोठ्याप्रमाणावर चारा टंचाईला पशुपालकांना सामोरे जावे लागते.     

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन होते. अतिरिक्त हिरवा चारा पशुपालक वाळवून साठवून ठेवतात. वाळवून साठवताना त्यातून मिळणारे पोषक घटक कमी होत जातात व चारा निकृष्ट होतो. चाऱ्याची पौष्टिकता टिकवून ठेवण्यासाठी त्याचा मुरघास बनविण्याचे तंत्रज्ञान पशुपालकानी आत्मसात केले पाहिजे. तसेच ज्या पशुपालकांकडे वर्षभर सिंचनाची सुविधा आहे, असे पशुपालक मुद्दाम ठरवून सुद्धा आपल्या संकरीत/देशी जनावरांपासून भरघोस उत्पादन घेण्यासाठी वर्षभर फुलोऱ्यातील चारा किंवा चीकातील मका पशुधनास दररोज निरंतर देवू शकत नाहीत. त्यासाठी चीकातील मका/ फुलोऱ्यातील चाऱ्याचा मुरघास बनवून ठेवल्यास त्यातील उच्चतम पौष्टिकता  जनावरांना वर्षभर दररोज निरंतर मिळू शकेल व अधिक फायद्याचा दुग्धव्यवसाय करणे शक्य होते. चाऱ्यातील जास्तीत जास्त पौष्टिक घटक आहे त्या स्थितीत दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी चारा हवाबंद करून साठवणूक करण्याच्या प्रक्रियेला मुरघास म्हणतात.

मुरघास बनविण्यासाठी साठी चारा पिके –

         मुरघास हा हिरव्या चाऱ्यापासूनच बनविला जातो. मुरघास बनविण्यासाठी मुख्यत्वे एकदल पिकांचा फुलोऱ्यात आलेवर किंवा त्याच्या दाण्यात चिक तयार झाल्यावर वापर केला जातो. यात मका, ज्वारी (कडवळ), बाजरी, शुगर ग्रेझ, न्युट्रीफीड, ओट (सातू) किंवा हत्ती गवत यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर द्विदल पिके जसे लसून घास, बरशीम, चवळी तसेच अझोला यांचा मुरघासातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी एकदल पिकांमध्ये मिसळून वापर केला जातो.

मुरघास बनविण्यासाठी साठी चारा पिकांमध्ये खालील गोष्टी असाव्यात –

 • त्यात ३० ते ३५ टक्के शुष्क घटक असावेत
  • त्यात किण्वन प्रक्रिया होणेसाठी भरपूर प्रमाणात सहज उपलब्ध होणारे कर्बोदके (शर्करा) असावेत
  • दाब दिल्यास तो चारा मुरघास बॅग, बेल्स (गासड्या/गठ्ठे) किंवा मुरघास बंकर/हौद यामध्ये घट्ट दबून बसावा 

मुरघास बनविण्याची पद्धत –

          चारा फुलोऱ्यात आल्यावर त्याची कापणी एकाचवेळेस करून घ्यावी. चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण अधिक असल्यास एक दिवस चारा सुकून द्यावा व दुसऱ्या दिवशी त्याची कुट्टी करून घ्यावी. मुरघास बंकर/हौदाचा दरवाजा लाकडी फळ्या व प्लास्टिकचा कागद वापरून बंद करावे. बॅग वापरणार असल्यास सपाट जागेवर बॅग उघडून धरावी व आतील प्लास्टिकची बॅग (ईनर) सर्व कोपरयात व्यवस्थित बसवून घ्यावी.  बंकर/हौद किंवा बॅग मध्ये  कुट्टी केलेला चारा भरण्यास सुरवात करावी. प्रत्येक थर व्यवस्थित दाबून भरावा. प्रत्येक अर्धा फुटाच्या थरानंतर मुरघास कल्चर टाकावे.

          थरावर थर व्यवस्थित दाबून बंकर/हौद किंवा बॅग भरून घ्यावी. प्रत्येक थरावर दही, मीठ व गुळाच्या पाण्याचा शिडकाव करावा. यासाठी एक टन मुरघास साठी १ लिटर दही, १ किलो मीठ व १ किलो खराब गुळ किंवा मळी वापरावी. हे द्रावण न वापरातही मुरघास बनविता येतो. दाब देण्यासाठी पायाने तुडवून किंवा धुम्मसच्या सहाय्याने किंवा बंकरच्या बाबतीत ट्रक्टरच्या सहाय्याने चारा दाबून भरावा जेणेकरून त्यात हवा शिल्लक राहणार नाही. बंकरच्या वरील बाजूस एक ते दीड फूट जास्त चारा भरून त्यावर प्लास्टिक कागदाचे हवाबंद अच्छादन करावे. त्यावरुन बंकरच्या वरील भागावर वाळूचे भरलेल्या गोण्या किंवा विटा यांचे वजन ठेवावे जेणेकरून बंकर हवाबंद होईल. बॅगचे तोंड व्यवस्थित बांधून त्यावरही वजन ठेवावे.  नैसर्गिकरित्या मुरघास ४५ दिवसांत तयार होतो, परंतु मुरघास कल्चरचा वापर केल्यास २१ दिवसात मुरघास तयार होतो त्याचा रंग पिवळसर सोनेरी होतो.

मुरघास तयार होतानाचे रासायनिक बदल –

         हिरवा चारा हवाबंद केल्यानंतर त्यात शिल्लक असलेला प्राणवायू (ऑक्सिजन) हा चारा पिकातील पेशी, सूक्ष्म जीवाणू व एकपेशीय बुरशी श्वसनासाठी वापरतात. जीवाणू वाढीसाठी चाऱ्यातील कर्बोदके वापरतात त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे आम्ल तयार होतात, तसेच उष्णता वाढू लागते. हळूहळू प्राणवायू संपतो व श्वसनाची प्रक्रिया बंद होते. यानंतर ह्या हवाबंद चाऱ्यातील सर्व प्रकारच्या प्रक्रिया बंद होतात व मुरघास तयार होतो.  तयार मुरघासाला सोनेरी पिवळा रंग व आंबट गोड वास येतो.  तो हवाबंद ठेवल्यास आहे असाच दीड ते दोन वर्षापर्यंत साठवता येतो.

मुरघास खाऊ घालण्याची पद्धत –

         ज्यावेळेस चाऱ्याची गरज असेन त्यावेळेस मुरघास उघडावा. एकदा मुरघास उघडल्यावर रोज त्यातील कमीत कमी १ ते १.५ फुट जाडीचा थर मुरघास संपेपर्यंत वापरला पाहिजे व काढून झाल्यावर पुन्हा व्यवस्थित हवाबंद करून ठेवावा. सहा महिने पेक्षा कमी वयाच्या वासरांना मुरघास खाऊ घालू नये. मोठ्या जनावरांना १० ते १५ किलो मुरघास खाऊ घालता येतो. मुरघासाला येणाऱ्या आंबट गोड वासामुळे जनावरे मुरघास आवडीने खातात.

          त्यावर बुरशी आली असल्यास किंवा रंग काळपट झाला असल्यास असा मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.

मुरघास चे फायदे –

 • वर्षभर एकाच प्रतीचा व अधिक पौष्टीक्तेचा चारा मिळाल्याने जनावरे भरपूर दुध देतात.वेळेवर माजावर येवून गाभण राहण्यास मदत होते.
 • कालवडी / रेड्यांची चांगली वाढ होऊन, त्यांचेपासून भरपूर दुग्धोत्पादन देणाऱ्या गाई म्हैशी तयार होतात.
 • पावसाळ्यात कमी खर्चात तयार होणारा अतिरिक्त हिरवा चारा त्याच्या पौष्टिकतेसह १ ते १.५ वर्षें साठवता येतो.
 • सर्व चारा एकाच वेळेस काढल्याने शेत जमीन लवकर मोकळी होते व पुन्हा चारा उत्पादनासाठी वापरता येते.
 • रोज चारा आणणे व कुट्टी करणे साठी लागणारा वेळ वाचतो. त्यामुळे मजूरही कमी लागतात.
 • कमी जागेत जास्त चाऱ्याची साठवणूक करता येते. एका घनमीटर जागेत ५५० ते ६०० किलो मुरघास साठविता येतो.
 • टंचाईच्या काळात हिरवा चारा मुरघासच्या स्वरुपात प्राप्त झालेने दुग्ध उत्पादन टिकून राहते.
 • मुरघास आवडीने व संपूर्णपणे खाल्ला जात असल्याने चाऱ्याची नासाडी होत नाही.

एकूणच मुरघासामुळे दुग्धव्यवसाय फायद्याचा होतो.

पशुपालकांनो हे ध्यानात ठेवा

 • फक्त हिरव्या चाऱ्याचाच मुरघास तयार होतो.
 • मका हे मुरघास बनविण्यासाठीचे सर्वोत्तम पिक आहे.
 • पहिल्यांदा मुरघास बॅग मध्ये थोड्या प्रमाणात मुरघास बनवून अनुभव घ्यावा.
 • मुरघास उत्तम बनण्यासाठी वापरावयाचे संवर्धके तज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच वापरावेत.
 • बुरशी वाढलेला व काळा पडलेला मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.
 • एकदा मुरघास उघडल्यावर त्यातील वरील कमीत कमी १ ते १.५ फुटाचा थर रोज काढावाच.

डॉ. सचिन रहाणे (७०३८५३५१८१ ), डॉ संतोष वाकचौरे ( ७०८३६३९५५३ ),
पशुधन विकास अधिकारी तथा सदस्य “चारा साक्षरता अभियान” समन्वय समिती, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

मुरघास – एक वरदान

महाराष्ट्र राज्याने ह्या वर्षी उन्हाळ्यातील पाणी टंचाई आणि पावसाळ्यातील भयानक पूर या दोन्हीही टोकाच्या परिस्थितीचा अनुभव घेतला. दोन्हीही परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याच्या बिकट समस्येला पशुपालकांना सामोरे जावे लागले. अश्या वेळेस, हिरवा चारा हवाबंद करून त्यातील जास्तीत जास्त पौष्टिक घटक आहे त्या स्थितीत दीर्घकाळ टिकवून ठेवून बनविलेला मुरघास अनेक ठिकाणी वरदान ठरला.    

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन होते. अतिरिक्त हिरवा चारा पशुपालक वाळवून साठवून ठेवतात. वाळवून साठवताना त्यातून मिळणारे पोषक घटक कमी होत जातात व चारा निकृष्ट होतो. चाऱ्याची पौष्टिकता टिकवून ठेवण्यासाठी त्याचा मुरघास बनविण्याचे तंत्रज्ञान पशुपालकानी आत्मसात केले पाहिजे. तसेच ज्या पशुपालकांकडे वर्षभर सिंचनाची सुविधा आहे, असे पशुपालक मुद्दाम ठरवून सुद्धा आपल्या संकरीत/देशी जनावरांपासून भरघोस उत्पादन घेण्यासाठी वर्षभर फुलोऱ्यातील चारा किंवा चीकातील मका पशुधनास दररोज निरंतर देवू शकत नाहीत. त्यासाठी चीकातील मका/ फुलोऱ्यातील चाऱ्याचा मुरघास बनवून ठेवल्यास त्यातील उच्चतम पौष्टिकता जनावरांना वर्षभर दररोज निरंतर मिळू शकेल व अधिक फायद्याचा दुग्धव्यवसाय करणे शक्य होते.

मुरघास बनविण्यासाठी साठी चारा पिके –

         मुरघास बनविण्यासाठी मुख्यत्वे एकदल पिकांचा फुलोऱ्यात आलेवर किंवा त्याच्या दाण्यात चिक तयार झाल्यावर वापर केला जातो. यात मका, ज्वारी (कडवळ), बाजरी, शुगर ग्रेझ, न्युट्रीफीड, ओट (सातू), हत्ती गवत किंवा उसाचे वाढे यांचा वापर केला जातो. मुरघास हा हिरव्या चाऱ्यापासूनच बनविला जातो. त्यात ३० ते ३५ टक्के शुष्क घटक आणि किण्वन प्रक्रिया होणेसाठी ७ ते ९ टक्के सहज उपलब्ध होणारे कर्बोदके (शर्करा) असावेत.

मुरघास बनविण्याची पद्धत –

          चारा फुलोऱ्यात आल्यावर त्याची कापणी एकाचवेळेस करून घ्यावी. चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण अधिक असल्यास एक दिवस चारा सुकून द्यावा व दुसऱ्या दिवशी त्याची कुट्टी करून घ्यावी. मुरघास बंकर/हौदाचा दरवाजा लाकडी फळ्या व प्लास्टिकचा कागद वापरून बंद करावे. बॅग वापरणार असल्यास सपाट जागेवर बॅग उघडून धरावी व आतील प्लास्टिकची बॅग (ईनर) सर्व कोपरयात व्यवस्थित बसवून घ्यावी.  बंकर/हौद किंवा बॅग मध्ये  कुट्टी केलेला चारा भरण्यास सुरवात करावी. प्रत्येक थर व्यवस्थित दाबून भरावा. प्रत्येक अर्धा फुटाच्या थरानंतर मुरघास कल्चर टाकावे.

          थरावर थर व्यवस्थित दाबून बंकर/हौद किंवा बॅग भरून घ्यावी. दाब देण्यासाठी पायाने तुडवून किंवा धुम्मसच्या सहाय्याने किंवा बंकरच्या बाबतीत ट्रक्टरच्या सहाय्याने चारा दाबून भरावा जेणेकरून त्यात हवा शिल्लक राहणार नाही. बंकरच्या वरील बाजूस एक ते दीड फूट जास्त चारा भरून त्यावर प्लास्टिक कागदाचे हवाबंद अच्छादन करावे. त्यावरुन बंकरच्या वरील भागावर वाळूचे भरलेल्या गोण्या किंवा विटा यांचे वजन ठेवावे जेणेकरून बंकर हवाबंद होईल. बॅगचे तोंड व्यवस्थित बांधून त्यावरही वजन ठेवावे.  नैसर्गिकरित्या मुरघास ४५ दिवसांत तयार होतो, परंतु मुरघास कल्चरचा वापर केल्यास २१ दिवसात मुरघास तयार होतो.

मुरघास तयार होताना होणारे जैव रासायनिक बदल  –    

                    मुरघास तयार होताना चाऱ्यात अनेक जैव रासायनिक बदल होतात ते पुढील प्रमाणे

 • श्वसन

         हिरवा चारा हवाबंद केल्यानंतर त्यात शिल्लक असलेला प्राणवायू (ऑक्सिजन) हा चारा पिकातील पेशी, सूक्ष्म जीवाणू व एकपेशीय बुरशी श्वसनासाठी वापरतात. सुरवातीच्या दोन दिवसातच हळूहळू प्राणवायू संपतो व श्वसनाची प्रक्रिया बंद होते. त्यामुळे चाऱ्याच्या पेशीतील होणाऱ्या जैविक प्रक्रिया थांबतात. यावेळेस तापमान २० ते ३२ अंश सेल्सिअस पर्यंत असते.

 • लॅक्टिक अॅसिड किण्वन प्रक्रिया

चाऱ्यावर निसर्गतः अनेक प्रकारचे जीवाणू असतात त्याचबरोबर मुरघास कल्चर मधील जीवाणू स्वतःच्या वाढीसाठी चाऱ्यातील कर्बोदके वापरतात. हे जीवाणू प्राणवायू असताना व नसताना  २७ ते ३७ अंश सेल्सिअस तापमानात जोमाने वाढतात व लॅक्टिक अॅसिड तयार करतात. लॅक्टिक अॅसिडचे प्रमाण हळूहळू वाढत जाऊन २१ दिवसात चाऱ्याचा सामू (पीएच) ४ पेक्षा कमी झाल्यावर जीवाणूंची वाढ थांबते पर्यायाने किण्वन प्रक्रिया सुद्धा थांबते.

 • चाऱ्यातील एन्जाइम्स च्या क्रिया

चाऱ्यातील जैव रासायनिक क्रिया ह्या एन्जाइम्स मुळेही घडून येत असतात. यात अॅसेटिक, ब्यूटरिक, प्रोपीओनिक आणि लॅक्टिक अॅसिड तयार होतात. ह्यांच्या मुळे मुरघासाला चव व गंध प्राप्त होत असतो. अॅसेटिक अॅसिड मुळे व्हिनेगार सारखा आंबट वास येतो तर लॅक्टिक अॅसिड मुळे आंबट गोड वास येतो. परंतु ब्यूटरिक अॅसिड अधिक निर्माण झाल्यास मुरघासाला खराब वास येतो. त्यामुळे उत्तम मुरघास तयार होण्यासाठी चाऱ्याच्या एन्जाइम्स क्रिया लवकर थांबणे आवश्यक असते. चाऱ्याचा सामू ४ पेक्षा कमी झाल्यास व तापमान वाढल्यानंतर ह्या क्रिया बंद होतात.

मुरघास उत्तम बनण्यासाठी वापरावयाचे विविध संवर्धके –  

         मुरघास तयार होताना होणाऱ्या जैव रासायनिक क्रिया आपण समजून घेतल्या आणि त्यानुसार मुरघास तयार करताना संवर्धके वापरली तर उत्कृष्ट प्रतीचा मुरघास तयार करता येईल.

अ)किण्वन प्रक्रिया वाढविण्यासाठीचे संवर्धके – काही पिकांमध्ये किण्वन प्रक्रिया होण्यासाठीचे जिवाणूंचे    योग्य प्रमाण नसल्यास त्यात बाहेरून काही जीवाणू संवर्धके (मुरघास कल्चर) वापरावीत. यात प्रामुख्याने लॅक्टिक अॅसिड तयार करणारे जीवाणू असतात. हे वापरल्याने योग्य प्रकारे किण्वन होऊन अनावश्यक जीवाणू व बुरशीची वाढ थांबते.

ब)मुरघासाची पौष्टिकता वाढविण्यासाठीचे संवर्धके – उसाच्या वाढ्यांसारख्या काही पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते त्यावेळेस नत्राचे प्रमाण वाढविणारे घटक जसे युरिया ३ ते ५ किलो प्रति टन वापरावा. तसेच कर्बोदकांचे प्रमाण वाढविण्यासाठी मळी किंवा गुळ १० ते २० किलो प्रति टन वापरावे. युरिया व गुळाचे प्रमाण पिकाच्या गुणवत्ते नुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने ठरवावे.

क) मुरघासाची पाचकता वाढविण्यासाठीचे संवर्धके – काही पिकांमधील न पचणाऱ्या तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते, अश्यावेळेस त्यात एन्जाइम्सचा वापर केल्यास ते पचनास सोपे होते. तसेच तंतुमय पदार्थांमधील शर्करा जीवाणूंच्या किण्वन प्रक्रियेस सहज उपलब्ध होते. त्यामुळे मुरघास लवकर तयार होण्यास मदत होते. तसेच एन्जाइम्स च्या वापरामुळे तयार मुरघास, जनावरांच्या कोठी पोटातील जीवाणूंना सुद्धा पचनास सोपा जातो व अधिकाधिक उर्जा तयार होऊन जनावरांची उत्पादकता वाढते.

उत्कृष्ट मुरघासाचे वैशिष्टे –

 • सोनेरी पिवळा रंग
 • आंबट गोड वास
 • सामू (पीएच) ३.५ ते ४
 • त्यात ६५ ते ७० टक्के ओलावा

मुरघास खाऊ घालण्याची पद्धत –

         एकदा मुरघास उघडल्यावर रोज त्यातील कमीत कमी १ ते १.५ फुट जाडीचा थर मुरघास संपेपर्यंत वापरला पाहिजे व काढून झाल्यावर पुन्हा व्यवस्थित हवाबंद करून ठेवावा. सहा महिने पेक्षा कमी वयाच्या वासरांना मुरघास खाऊ घालू नये. मोठ्या जनावरांना १० ते १५ किलो मुरघास खाऊ घालता येतो.

          त्यावर बुरशी आली असल्यास किंवा रंग काळपट झाला असल्यास, असा मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.

मुरघास चे फायदे –

 • वर्षभर एकाच प्रतीचा व अधिक पौष्टीक्तेचा चारा मिळाल्याने जनावरे भरपूर दुध देतात. वेळेवर माजावर येवून गाभण राहण्यास मदत होते.
 • कालवडी / रेड्यांची चांगली वाढ होऊन, त्यांचेपासून भरपूर दुग्धोत्पादन देणाऱ्या गाई म्हैशी तयार होतात.
 • पावसाळ्यात कमी खर्चात तयार होणारा अतिरिक्त हिरवा चारा त्याच्या पौष्टिकतेसह १ ते १.५ वर्षें साठवता येतो.
 • सर्व चारा एकाच वेळेस काढल्याने शेत जमीन लवकर मोकळी होते व पुन्हा चारा उत्पादनासाठी वापरता येते.
 • रोज चारा आणणे व कुट्टी करणे साठी लागणारा वेळ वाचतो.
 • कमी जागेत म्हणजेच एका घनमीटर जागेत ५५० ते ६०० किलो मुरघास साठविता येतो.
 • टंचाईच्या काळात हिरवा चारा मुरघासच्या स्वरुपात प्राप्त झालेने दुग्ध उत्पादन टिकून राहते.
 • मुरघास आवडीने व संपूर्णपणे खाल्ला जात असल्याने चाऱ्याची नासाडी होत नाही.

डॉ. सचिन रहाणे, ७०३८५३५१८१
डॉ संतोष वाकचौरे, ७०८३६३९५५३
पशुधन विकास अधिकारी